0
आचारसंहिता धुडकावून सुरू झालेल्या पोलादपूर ठाणे

शिवशाही गाडीऐवजी त्याच तिकीटात निमआराम बस

खासगी प्रवासी वाहतुकदारांचा एस.टी.सेवेला फास?

पोलादपूर (शैलेश पालकर)- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पोलादपूर एस.टी. स्थानकामधून कोकण विभागीय पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता धुडकावून राजकीय व्यक्तींच्याहस्ते नारळफोडी करून सुरू झालेली पोलादपूर ठाणे शिवशाही बस आज मंगळवारी सकाळी चक्क त्याच तिकिटदरामध्ये निमआराम बस सोडण्यात आल्याने संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. पोलादपूर एस.टी. स्थानकाच्या 100 मीटर्स परिघात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांचा पोलादपूर एस.टी. स्थानकातून सुटणाऱ्या एस.टी.सेवेला फास बसला असून यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाला मुंबई, पुणे, ठाणे या शहरी भागात जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतुकीखेरीज निर्माण झालेला शिवशाही बसचा सक्षम पर्याय मृतवत् झाल्याचे मानले जात आहे.
शुक्रवार, दि. 1जून 2018 रोजी पोलादपूर एस.टी. स्थानकामधून विद्यमान आ.भरतशेठ गोगावले आणि विद्यमान रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांचा वाढदिवस असल्याचे औचित्य साधून पोलादपूर ठाणे शिवशाही बसची कंत्राटी एस.टी. प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. कोकण विभागीय पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता या दिवशी असूनही राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करताना ही सेवा एस.टी. महामंडळाची कंत्राटी सेवा असल्याने आचारसंहिता लागू नाही, असे कारण संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.
या शिवशाही बस सेवेचा पोलादपूर एस.टी.स्थानकाच्या परिसरातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवेच्या धंद्यावर अनिष्ठ परिणाम झाला. यानंतर अनियमितपणे सुरू राहिलेली पोलादपूर ठाणे शिवशाही बससेवा आज मंगळवारी दि. 12 जूनरोजी सकाळी 7 वाजता शिवशाहीऐवजी चक्क हिरव्या रंगाची जुनीपुराणी निमआराम बस दिल्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा भूर्दंड सोसावयास लावणारी ठरली. आकाश शेवाळे या विद्यार्थ्याने पोलादपूर ते ठाणे या शिवशाही बसचे लोणेरे ते ठाणे असे 236 रूपयांचे आरक्षित तिकिट काढून प्रवासासाठी लोणेरे येथे शिवशाही बसची वाट पाहिली तर त्याऐवजी चक्क हिरव्या रंगाची निमआराम बस आल्याचे पाहून त्यास धक्का बसला. त्यामुळे त्याने सदर निमआराम बसचे वाहक ए.एच.मिंडे यांच्याकडे तक्रारवहीची मागणी केली असता त्यांनी तसे न करता महाड आगाराकडे तक्रार करण्याचे उत्तर दिले. यावेळी आरक्षित तिकिटाच्या फरकापोटी आकाश शेवाळे यास सात रूपये परतावा देण्यात आला तर महाडपासून प्रवास करणाऱ्यांना 9 रूपये परतावा देण्यात आला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
या मनस्तापामुळे आकाश शेवाळे याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या कानावर सदर प्रकार घातला असता दरेकर यांनी याप्रकरणी महाड आगाराच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यावेळी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी एकूण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top