0
.. तर ई-पॉस मशीन वाजत गाजत तहसील कार्यालयात जमा करणार

मशीनमधील त्रुटींमुळे दुकानदार व कार्डधारक त्रस्त

 रास्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनमधील त्रुटींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त बनले आहेत. तरी यातील त्रुटी दूर न झाल्यास रास्त धान्य दुकानदार, कार्डधारक व स्वाभीमान पक्ष कार्यकर्ते यांना सोबत घेत आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत मिरवणूक काढतील. व  ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात परत करतील. असा इशारा मालवण वायरी येथील रास्त धान्य दुकानदार तथा माजी तालुकध्यक्ष सुहास हडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार साईनाथ गोसावी यांना दिला आहे.


शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने रास्त धान्य दुकानदारांना धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीन दिल्या आहेत. मात्र या मशीनमध्ये अनेक त्रुटी असल्याने गेले काही दिवस ग्राहकांना धान्यच वितरित झालेले नाही. याप्रकरणी मंगळवारी रास्त धान्य दुकानदार तथा माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर, छोटू सावजी, दिलीप घारे, भगवान लुडबे, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर, मिलिंद झाड, भाई लुडबे, आनंद हडकर, प्रकाश गरुड, संजय केळुसकर, प्रियांका हडकर, प्रकाश रोगे, गणेश चिंदरकर, हरी कोयंडे, नंदू झाड यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार साईनाथ गोसावी यांची भेट घेत निवेदन सादर केले.
ई-पॉस मशीनमधील अनेक ग्राहकांचे आधार क्रमांकच गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ ३० टक्के लाभार्थ्यांना धान्याचे वितरण झाले आहे. ज्यांना १२ अंकी नंबर मिळाला त्यांचेच धान्य मशीनमध्ये नोंद झाले आहे. प्रत्यक्षात सर्व ग्राहकांचे आधारक्रमांक, बँक खाते यासह अन्य माहिती संबंधित विभागास देऊनही त्याची नोंद या मशीनमध्ये झालेली नाही. अनेक ई-पॉस मशीनना रेंज मिळत नसल्याने दुकानदारांचे हाल होत आहेत. लाभार्थ्यांची परवड होऊ नये यासाठी काही रास्त धान्य दुकानदारांनी खासगी कंपन्यांचे राऊटर खरेदी करत वायफाय सुविधा घेतली आहे असे असूनही ई-पॉस मशीनला रेंज मिळत नसल्याने अनेक ग्राहकांना धान्य न घेताच माघारी परतावे लागत आहे.

लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक थम मशीनमध्ये घेतल्यावर चुकीचे मेसेज येत असून मशीन चालत नसल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत ऑपरेटर श्री. गावडे तसेच हेल्पलाइनवर मदत मागूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ई-पॉस मशीनमधील त्रुटींमध्ये धान्य नेण्यास दूरवरून येणार्‍या ग्राहकांना माघारी परतावे लागत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या मशीनमधील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही येत्या चार दिवसात न झाल्यास रास्त धान्य दुकानदार, ग्राहक, स्वाभीमानचे पदाधिकारी आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली वाजतगाजत तहसील कार्यालयात येऊन या मशीन परत करतील असा इशाराही श्री. हडकर यांनी यावेळी दिला.



फोटो - ई-पॉस मशीनमधील त्रुटी संदर्भात रास्त धान्य दुकानदार सुहास हडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार साईनाथ गोसावी यांना निवेदन सादर केले.

Post a Comment

 
Top